काळ - मर्यादा 10
मानव आणि त्यांच्या इंद्रिया 10
मानव आणि त्यांचे शोध / आविष्कार 10
भूगोल 10
प्राणी 10
पुणेकरांनो तुम्हाला माहीत आहे का, खनिजे, खडक किंवा तत्सम स्रोतांपासून प्राप्त केली जातात किंवा खणून काढली जातात. ती मुळात खनन करून मिळविली जातात. खनन किंवा खाण हा शब्द आपल्याला अनेक वेळा ऐकायला मिळतो. त्यासंदर्भातच, आज आपण महाराष्ट्रात महत्त्वाची खनिजे कोठे आढळतात, हे पाहूया.
महाराष्ट्र राज्यामध्ये खालील महत्त्वाची खनिजे आढळून येतात.
(1) कोळसा :- खनिज कोळसा हे एक ऊर्जा शक्तीचे महत्त्वाचे साधन आहे आणि म्हणूनच राष्ट्राच्या विकासात या खनिजाचा वाटा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील कोळशाचे अंदाजित साठे 5539.07 दशलक्ष टन इतके आहेत. राज्यात कोळशाचे साठे नागपूर, चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांत आढळून आले आहेत. राज्यातील उत्पादनापैकी अधिकांश कोळसा वीज निर्मिती, सिमेंट उत्पादन, स्पॉन्ज आयर्न व इतर अनेक उद्योगांसाठी वापरण्यात येतो.
(2) मॅगनीज :- भारतातील महत्त्वाचे मॅगनीजचे साठे महाराष्ट्रात आहेत. या खनिजांचे नागपूर व भंडारा जिल्ह्यांत विपुल साठे आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात काही प्रमाणात साठे आढळून येतात. मॅगनीजचा उपयोग फेरोमॅगनीज, लोखंड व पोलाद उद्योगात तसेच बॅटरी सेल उद्योगात केला जातो. राज्यातील मॅगनीजचे एकूण साठे 20.85 दशलक्ष टन इतके आहेत.
(3) लोहखनिज :- राज्यातील महत्त्वाचे लोह खनिजांचे साठे चंद्रपूर, गडचिरोली व सिंधुदूर्ग जिल्ह्यांत आहेत. महाराष्ट्रात लोह खनिजाचे अंदाजित साठे 360 दशलक्ष टन आहेत. लोह खनिजाचा उपयोग स्टील व स्पॉन्ज आयर्न उद्योगात केला जातो.
(4) चुनखडक :- चुनखडकाचे विपुल साठे राज्याच्या चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांत आढळतात. उच्च प्रतीच्या चुनखडकांच्या साठ्यांव्यतिरिक्त राज्यात बर्याच ठिकाणी कमी प्रतीचे चुनखडकाचे साठे आढळतात. राज्यात चुनखडकाचे अंदाजित साठे 1,310 दशलक्ष टन इतके आहेत. चुनखडकाचा उपयोग प्रामुख्याने सिमेंट तयार करण्याकरिता, लोह व पोलाद प्रकल्पात अभिवाह (Flux) म्हणून तसेच इतर अनेक उद्योगांत करण्यात येतो.

(5) डोलोमाईट :- डोलोमाईटचे साठे चंद्रपूर, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत आढळतात. डोलोमाईट अभिवाह म्हणून लोखंड व पोलाद उद्योगांत, कोळसा खाणीत भुकटी म्हणून तसेच शोभिवंत दगड म्हणून उपयोगात आणतात. डोलोमाईटचे महाराष्ट्रातील अंदाजित साठे 61.30 दशलक्ष टन आहेत.
(6) कायनाईट-सिलीमनाईट :- राज्यातील कायनाईट व सिलीमनाईटचे साठे फक्त भंडारा जिल्ह्यात आढळतात. या खनिजांचा उपयोग धातुशास्त्रीय उद्योग, सिमेंट निर्मिती, काच निर्मिती इत्यादी उद्योगांमध्ये लागणाऱ्या उच्च प्रतीच्या उष्णता रोधक विटा तयार करण्याकरिता होतो. या खनिजांचे अंदाजित साठे 2.61 दशलक्ष टन आहेत.
(7) बॉक्साईट :- प्रामुख्याने बॉक्साईट या खनिजापासून ॲल्युमिनियम धातूची निर्मिती होते आणि सिमेंट उद्योगातही याचा वापर करण्यात येतो. हे खनिज कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे व सातारा जिल्ह्यातील डोंगरमाथ्यावरील थरात आढळते. सदर खनिजांचे महाराष्ट्रातील अंदाजित साठे 112.951 दशलक्ष टन आहेत.
(8) सिलीका वाळू :- सिलीका वाळूचे साठे मुख्यत्वेकरून राज्यातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांत आढळतात. सिलीका वाळू ही ओतकामासाठी तसेच काचनिर्मितीसाठी वापरली जाते. सिलीका वाळूचे अंदाजित साठे 85.207 दशलक्ष टन आहेत.
(9) क्रोमाईट :- क्रोमाईट या खनिजाचा उपयोग मुख्यत्वेकरून धातुशास्त्रीय उद्योग, उष्णतारोधक वस्तू व रासायनिक उद्योगात केला जातो. या खनिजाचे साठे नागपूर, भंडारा, सिंधुदूर्ग व चंद्रपूर जिल्ह्यांत आढळतात. या खनिजांचे अंदाजित साठे 0.659 दशलक्ष टन आहेत.
(10) बेराईट :- हे खनिज चंद्रपूर जिल्ह्यांत आढळून येते. खनिजांचे अंदाजित साठे 0.1365 दशलक्ष टन आहेत. या खनिजाचा उपयोग मुख्यत्वेकरून तेल विहिरीच्या खोदकामात आणि पेंट उद्योगात केला जातो.
(11) तांबे :- नागपूर जिल्ह्यात तांबे हे खनिज पुलार, तांबेखाणी, कोलारी इत्यादी ठिकाणी तसेच चंद्रपूर जिल्ह्यात अल्प प्रमाणात आढळून येते. खनिजांचे अंदाजित साठे 7.708 दशलक्ष टन आहेत.
(12) जस्त :- जस्तयुक्त खनिजे नागपूर जिल्ह्यातील तांबेखाणी, कोलारी, भवरी इत्यादी गावांच्या परिसरात आढळून येत असून या क्षेत्रात सुमारे 8.27 दशलक्ष टन खनिज साठे अंदाजित करण्यात आले आहेत. जस्त या खनिजाचा उपयोग गॅल्व्हनायजिंग, बॅटरी, अलॉय (मिश्रधातू), रसायने, संरक्षण इत्यादी उद्योग क्षेत्रात करण्यात येतो.
(13) टंगस्टन :- टंगस्टन खनिज नागपूर जिल्ह्यात आगरगाव, कुही, खोबना इत्यादी क्षेत्रात आढळून येत असून 19.98 दशलक्ष टन वुल्फ्रामाईट या टंगस्टनयुक्त खनिजाचे साठे अंदाजित करण्यात आले आहेत.
(14) फ्लोराईट :- फ्लोराईट खनिज चंद्रपूर जिल्ह्यात डोंगरगाव इत्यादी क्षेत्रात आढळून येत असून 0.1 दशलक्ष टन साठे अंदाजित आहेत.

याशिवाय, चला आता खनिजांची उपलब्धता आणि उत्पादन यासंबंधीची काही आकडेवारी बघू.
दख्खनचे पठार महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापलेले आहे. यामुळे महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक खडक संकुचित झाले आहेत. यामुळे, महाराष्ट्रात खनिज संपत्ती फारशी नाही. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या केवळ 12.33% भागातच खनिज संसाधने उपलब्ध आहेत. महाराष्ट्राच्या खनिज संपत्तीचे वितरण देखील असमान आहे. राज्याच्या 36 जिल्ह्यांपैकी केवळ 11 जिल्ह्यांमध्ये खनिजांचे जास्त केंद्रीकरण आहे.

संदर्भ
1. https://tinyurl.com/yc7tf97r
2. https://tinyurl.com/mtsy4brp